Akurdi News : ‘डीवायपीआययु’मध्ये एआयसीटीई आयडिया लॅबचे आयोजन

देशभरातून 25 प्राध्यापक-संशोधक होणार सहभागी

एमपीसी न्यूज – डी.वाय.पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे (डीवायपीआययु) उद्यापासून (गुरुवार, 23 सप्टेंबर) ‘एआयसीटीई आयडिया लॅब’ प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) सहकार्याने होणारा हा कार्यक्रम 23 ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत ‘डीवायपीआययु’च्या आकुर्डी येथील कॅम्पसमधील शांताई सभागृहात होणार आहे.

एआयसीटीई प्रशिक्षण आणि शिक्षण अकादमीचाही (अटल) सहभाग या कार्यक्रमात असणार आहे. देशभरातून सुमारे 25 प्राध्यापक-संशोधक या कार्यक्रमात सहभागी होणार असून, ते आपापले अभ्यास-प्रकल्प यावेळी सादर करतील. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, त्यासाठी एआयसीटीई ‘आयडीसी’चे सल्लागार डॉ. नीरज सक्सेना, एआयसीटीईचे सदस्य-सचिव राजीव कुमार तसेच ‘डीवायपीआययु’चे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन यांची प्रमुख उपस्थिती असेल. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखांतील प्राध्यापकांच्या सोबतच पीएचडी संशोधक, अभ्यासक, अभियंते आणि व्यावसायिकांसाठी देखील हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल.

आयडिया लॅब –

‘एआयसीटीई’ मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये ‘आयडिया लॅब’ (आयडिया, डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएशन अँड ऍप्लिकेशन) स्थापन करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांच्या असणाऱ्या मूलभूत ज्ञानाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या नवनवीन संकल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अभियांत्रिकी पदवीधरांना अधिक कल्पक आणि सर्जनशील बनवतानाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या व संशोधनाच्या मदतीने विविध प्रकारच्या समस्यांची उकल करणे, हा आयडिया लॅबमागील एक उद्देश आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना एकत्रितपणे आपल्या ज्ञानाचा आणि प्रयोगशीलतेचा प्रत्यक्ष उपयोग करता यावा यासाठी विविध तंत्रज्ञानविषयक सुविधा आयडिया लॅबच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रदान केल्या जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.