Akurdi News : कोरोना योद्धयांच्या रूपाने पांडुरंगाचे दर्शन : बशीर सुतार

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला व्यापले आहे. या महामारीमुळे यंदा पंढरीची वारी होऊ शकली नाही. मात्र, समाजातील गरजुंना जीवनावश्यक साहित्यासह सर्व प्रकारची मदत करुन कोरोना योद्धयांच्या रूपाने साक्षात पांडुरंगाने आपल्याला दर्शन दिले. संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या कोरोना योद्धयांचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार यांनी काढले.

कोरोना संकट काळात गरजूंसाठी दिवस रात्र सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार या कोरोना योद्धयांचा लॉयन्स क्लब ऑफ अग्र सफायर व पूर्णानगर विकास समिती यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

आकुर्डी येथील ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पूर्णानगर विकास समितीचे अध्यक्ष विकास गर्ग, लॉयन्स क्लब ऑफ अग्र सफायरचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, खजिनदार अशोक बन्सल, संचालक अशोक अग्रवाल, रवींद्र सातपुते,भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर आदी उपस्थित होते.

अशोक बन्सल म्हणाले, कोरोच्या संकटात सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याचे महत्वपूर्ण कार्य कोरोना योद्धयांनी केले आहे. त्यामुळे अशा कोरोना योद्धयांच्या कार्याचा सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे. या पुढील काळातही लॉयन्स क्लब ऑफ अग्र सफायरच्यावतीने  नागरिकांना सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क, कोरोना रुग्णांसाठी मोफत जेवण आदी सुविधा पुरविणार आहोत.

अशोक अग्रवाल म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटात कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉयन्स क्लब ऑफ अग्र सफायरच्यावतीने पुणे शहरात कोविड सेंटरची उभारणी केली. लवकरच कोरोना रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.