Akurdi news: पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेसाठी स्वतंत्र कक्ष सुरू

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व वाढता भौगोलिक विस्तार पाहून आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी स्वतंत्र कक्ष नसल्याने अंध, दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिक या लाभार्थ्यांना पुण्यात हेलपाटे मारावे लागत होते. प्रचंड मनःस्ताप करावा लागत होता. पण आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचा सामाजिक न्याय विभाग आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार केलेला पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यामुळे आता या योजनेसाठी शहरातच स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.

राज्य सरकारमार्फत अंध, दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत समाजातील या वंचितांना आर्थिक मदतीसोबतच इतर प्रकारची मदत करून त्यांना आधार दिला जातो.

पिंपरी-चिंचवडमधील 10 हजारहून अधिक वंचित नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागते.

मात्र, या योजनेचे कार्यालय पिंपरी-चिंचवडऐवजी पुण्यात होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील 10 हजारहून अधिक नागरिकांना कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तसेच इतर किरकोळ शासकीय कामांसाठी पुण्यात हेलपाटे मारावे लागत होते.

गरीब असल्या कारणामुळे या योजनेचा लाभ मिळणाऱ्या या लाभार्थ्यांना पुण्यात ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड आणि मनःस्ताप सहन करावा लागत होता.

ही बाब समजल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे सामाजिक विभागाकडे तसेच पुण्याच्या त्या त्या वेळच्या जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून पिंपरी-चिंचवडमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची मागणी केली.

पुण्यात ये-जा करण्यासाठी या योजनेच्या शहरातील लाभार्थ्यांना होणाऱ्या त्रासाकडे सरकारचे आणि शासनाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी लक्ष वेधले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

त्यानुसार आकुर्डी येथील अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयात हे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहे.

या कक्षात स्वतंत्र लिपिकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील १० हजारहून अधिक लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुण्यात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

आता पिंपरी-चिंचवडमध्येच लाभार्थ्यांचे योजनानिहाय अर्ज स्वीकारणे, अर्जांची प्राथमिक छाननी, आवश्यक कागदपत्रांची पुर्तता होणार आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठपुरावा करून आकुर्डी अप्पर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे स्वतंत्र कक्ष सुरू केल्याने लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.