Akurdi News : नागरी सुविधा केंद्रातील भ्रष्ट कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाई करा – संजय धुतडमल

एमपीसीन्यूज : नागरिकांकडून शासन धोरणाव्यतिरिक्त अधिकचे पैसे घेवून फेरफार (एडिटिंग) करून बोगस डोमिसाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदी दाखले देणाऱ्या जेएमके इंन्फोटेक प्रा. लि. कंपनी संचालित   आकुर्डी नागरिक सुविधा केंद्रामधील कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल यांनी केली आहे.

या संदर्भात धुतडमल यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देत आकुर्डी नागरिक सुविधा केंद्रामधील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्याची मागणी केली.

आकुर्डी नागरिक सुविधा केंद्रात भ्रष्टाचार सुरु असल्याचे पुरावे धुतडमल यांनी अण्णा हजारे यांच्यासमोर सादर केले आहेत. या केंद्रातील कर्मचारी राजेंद्र चव्हाण, प्रमोद पाटोळे, गणेश सूर्यवंशी, व्यवस्थापक अतुल देशपांडे व त्यांना पाठीशी घालणारे ‘जेएमके’चे संचालक विकास देवकर, किशोर लाहुरीकर यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

यांच्या काळात वितरीत झालेल्या प्रमाणपत्राची व कागदपत्रांची शासन स्तरावर चौकशी करून संबंधित आकुर्डी नागरिक सुविधा केंद्र चालविण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी धुतडमल यांनी केली आहे. या साठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करण्याची विनंतीही त्यांनी हजारे यांच्याकडे केली.

दरम्यान, या प्रश्नी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन अण्णा हजारे यांनी दिल्याची माहिती धुतडमल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.