Akurdi News : कायदा बनविणाऱ्यापेक्षा कायदा पाळायला शिकविणारे शिक्षक महत्त्वाचे – आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – लोकप्रतिनिधींद्वारे कायदे संमत करून त्याची पोलिसांमार्फत अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमध्ये हे दोन महत्वाचे घटक आहेत. परंतु कायदा पाळला पाहिजेत हे शिकविणारे शिक्षक हे अधिक महत्त्वाचे आहेत. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

आकुर्डी येथील डी. वाय पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या परिसंवादात ‘राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल( नि) एस. के. जोशी यांनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सत्कार केला.

_MPC_DIR_MPU_II

आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले कि, ‘सध्या गुन्हेगारीमध्ये तरुणांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ शिक्षा देणे पुरेसे नाही. तर शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व व संविधानाचे पावित्र्य समजावून सांगितले पाहिजेत. जीवन जगण्याचे देखील शिक्षण दिले पाहिजेत. तरुणांचा देश म्हणून जगात भारताची ख्याती आहे. तरुणांनी आपल्या कार्यशैलीने आलेल्या संधीचे सोने करावे.

टाळेबंदीमध्ये कॉलेज बंद असले तरी ऑनलाईन पद्धतीने अध्यापन कार्य सुरु आहे. या दरम्यान विद्यार्थी- पालक-शिक्षकांना कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. अशा वेळी अध्यात्म आणि नियमित व्यायामाद्वारे शारिरीक व मानसिक काळजी घ्यावी. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा भागवत गीतेमधील पौराणिक दाखले देत जीवनाला अध्यात्माची जोड असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शलाका पारकर यांनी तर आभार प्रा. जस्मिता कौर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. निरज व्यवहारे, डॉ. के.निर्मला, प्रा. अरविंद कोंडेकर, डॉ. अनुपमा पाटील, रश्मी श्रीवास्तव, डॉ. विजय वढाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.