Akurdi News : फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी लढा उभारणार : काशिनाथ नखाते

आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिवस उत्साहात साजरा; फेरीवाल्यांना शिधा वाटप

एमपीसीन्यूज : राज्यातील काही महानगरपालिका वगळता तर इतर मनपा क्षेत्रांमध्ये फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तिथे अनेक अडचणी आहेत. या अडचणी दूर करून प्रसंगी तेथे आंदोलन करून राज्यातील सर्व पथ विक्रेत्यांना अधिकृत परवाने मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्धार महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केला.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांना रेशन किट वाटप करुन फेरीवाला दिवस साजरा केला. त्यावेळी नखाते बोलत होते.

याप्रसंगी पुणे वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विजय पारगे, प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, महिला प्रमूख वृशाली पाटणे, माधुरी जलमूलवार, यासीन शेख, नागनाथ लोंढे, किरण साडेकर, सुशेन खरात, अंबादास जावळे, राजेश माने, यासिन शेख, सुधाकर गायकवाड, राजू बोराडे, सय्यद अली, संभाजी वाघमारे, वासुदेव मनुरकर आदी उपस्थित होते .

नखाते म्हणाले, देशभरामध्ये विविध ठिकाणी फेरीवाल्यांची स्थिती कोरोना संकट आणि लॉकडाउनमुळे बिकट झाली आहे. या संकटात मदत म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी पंधराशे रुपये दिले आहेत. ही रक्कम वाढवून अधिक प्रमाणात देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही अर्थिक मदत करावी यासाठी फेडरेशन आग्रही आहे.

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशनच्या वतीने विविध ठिकाणी पाठपुरावा केला जात आहे. केंद्र सरकारने किरकोळ क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली असून ही बाब अन्यायकारक आहे. यापूर्वीच्या सरकारने या कायद्याला परवानगी दिली असता सध्याच्या सत्ताधारी पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला होता. मात्र, हे सत्तेत आल्यापासून त्यांचे स्वागत केले जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे.

यामुळे देशभरातील किरकोळ गुंतवणूक आणि किरकोळ व्यापारी तसेच फेरीवाले आणखी संकटात सापडणार आहेत. त्यामुळे किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक रद्द करावी; अन्यथा तीव्र आंदोलन उभे राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नखाते यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.