Akurdi News : आकृर्डीतील गुरुद्वारात लसीकरण केंद्र सुरु, पोलीस आयुक्तांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – आकृर्डीतील श्री वाहेगुरु गुरुनानक मानसरोवर गुरुद्वारामध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. सेवादार मंजित सिंग खालसा यांच्यावतीने हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. 10) या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत असून, लसीकरण वाढवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी व नागरिकांना सहज लस उपलब्ध व्हावी यासाठी सेवादार मंजित सिंग खालसा यांनी पुढाकार घेत गुरुद्वारामध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरु केले आहे.

आज दुपारी दिड वाजता पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले. दिवसभरात 45 वर्षांवरील 60 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

मंजित सिंग खालसा म्हणाले, ‘कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. एक वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती आता आपल्या हातात लस आहे. लस घेऊन स्वःताला सुरक्षित करणं सध्या अधिक गरजेचे आहे. ही लस सुरक्षित आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. सध्या देशात 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे 45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी. थोड्या दिवसांनी लसीसाठी पात्र नागरिकांचा वयोगट कमी होईल तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी व सर्व नियमांचे पालन करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

मंजित सिंग खालसा यांना त्यांच्या या कार्यात गुरुद्वाराचे ट्रस्टी डॉ. दशमित सिंग, गोविंद वाधवा, विनोद आयदासानी तसेच, मनिष कटारिया व रवी नागपाल यांचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.