Akurdi : कांदा ८० पैसे किलो दराने वाटून त्याने दाखवली ‘मनाची श्रीमंती’!

एमपीसी न्यूज – कांद्याने ‘शंभरी’ पार केल्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून कांदा हद्दपार झालेला असताना सुमारे ३५० कुटुंबांना केवळ ८० पैसे किलो दराने प्रत्येकी एक किलो कांदा वाटून एका कार्यकर्त्याने ‘मनाची श्रीमंती’ दाखवून दिली. श्रीमंत जगताप असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ८० पैसे किलो दराने कांदा वाटप करून त्यांनी कल्पक उपक्रम राबविला.

कांदा महागल्याने भाजी विक्रेत्यांना सध्या कांदा विकण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः वाट पाहावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज आकुर्डी गावात कांदा घेण्यासाठी महिलांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पादनाचे वाटप करण्याची कल्पना डोक्यात होती. गेल्या काही दिवसांत कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांना कांदा खाणे परवडत नाही. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नाममात्र किमतीत कांदा वाटून लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न आपण केला. साहेबांचा ८० वा वाढदिवस असल्याने ८० पैसे हा दर ठेवला होता, असे श्रीमंत जगताप यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

जगताप यांनी ६० रुपये किलो भावाने सुमारे ३५० किलो कांदा खरेदी केला व कांद्याचा टेम्पो आकुर्डीगावात आणला. प्रत्येक कुटुंबाला एक-एक किलो याप्रमाणे त्यांनी कांद्याचे वाटप केले. जगताप यांच्या या उपक्रमाचे लाभार्थी कुटुंबांनी मनापासून कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.