Akurdi : भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेत प्रणव जांभळे, वैभवी शेळके, नम्रता नेलगी, गोविंद बामले प्रथम

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) रावेत येथील श्री गोविंद धाम मंदिराच्या वतीने घेण्यात आलेल्या भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेत लहान गटात प्रणव जांभळे व वैभवी शेळके तर मोठ्या गटात नम्रता नेलगी, गोविंद बामले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ रावेत येथे उत्साहात पार पडला. परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहरातील 37 शाळांमधील एक हजार 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या 177 विद्यार्थ्यांचा गुणगौरव, बक्षीस समारंभ आणि सहभागी शाळेतील मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर उषा तथा माई ढोरे, शिक्षण मंडळ सभापती मनीषा पवार, नगरसेविका आरती चोंधे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुंढे, ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख वा ना अभ्यंकर, उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संचालक शरद इनामदार, इस्कॉनचे गोपती दास आदी उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, “संतांच्या जन्मभूमीत, कर्मभूमीत हा सत्कार सोहळा होत आहे. इस्कॉनने आयोजित केलेला कार्यक्रम आगळा वेगळा आहे. गीतेचा जन्म रणांगणावर झाला आहे. भगवद्गीतेचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. या अभ्यासाने आत्मिक शांतता मिळते. भरकटत चाललेल्या पिढीला इस्कॉनच्या माध्यमातून वैचारिक मार्गदर्शन केले जात आहे.”

गोपती दास म्हणाले, “नीतीमूल्यांचे शिक्षण आणि त्याचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. भारतात सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेत सहभाग घेतला आहे. भगवद्गीता ही सर्वांसाठी आहे. ती ठराविक वर्गासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी आहे. मनावरील नियंत्रण, व्यक्तिमत्त्व विकास आणि मनुष्य म्हणून आपण कसे जगायला हवे याची शिकवण भगवद्गीता देते. मुलांवर चांगले संस्कार करणे ही काळाची गरज आहे. मागील चार वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापुढे देखील विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी काम केले जाणार आहे.”

अजित पवार म्हणाले, “इस्कॉनचे काम चांगले आहे. शालेय जीवनात भगवद्गीतेचा अभ्यास करायला मिळाला असल्याने लहान वयातच चांगल्या संस्कारांची रुजवण झाली आहे. भगवद्गीता आपल्याला अनेक गोष्टी शिकवते.”

“सर्व ग्रंथांची जननी म्हणजे भगवद्गीता आहे. भारतासारख्या सुसंस्कृत देशात शालेय जीवनातच ही नैतिकता पोहोचवणे गरजेचे आहे, असे शरद इनामदार यांनी सांगितले.

“आपल्या शरीराचे लाड पुरविण्यासाठी शिक्षण घेतलं जातं. पण भगवद्गीता शरीराचे लाड नव्हे तर मनाचे लाड पुरविण्याचे शिक्षण देते. मन, बुद्धी आणि आत्मा समजून घेणं म्हणजे शिक्षण आहे, असे मत मनोज देवळेकर यांनी व्यक्त केले.

  • पुरस्कारप्राप्त विद्यार्थी :
    लहान गट (पाचवी ते सातवी) :
    प्रथम – प्रणव जांभळे, वैभवी शेळके
    द्वितीय – इतिषा खेडकर
    तृतीय – वीणा मिरेकर

मोठा गट (आठवी ते दहावी)
प्रथम – नम्रता नेलगी, गोविंद बामले
द्वितीय – योगेंद्र मगदूम
तृतीय – कृष्णाली पवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.