Akurdi : यंदाची रमजान ईद साधेपणाने साजरी करणार : बशीर सुतार

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कोरोना योद्धयांचे पिंपरी चिंचवड मुस्लिम समाज विकास प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच या वर्षीची ईद साधेपणाने साजरी करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बशीर सुतार यांनी दिली.

रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठाणची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी सध्याच्या कोरोना महामारीच्या अनुषंगाने यंदा साधेपणाने रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, भाजपाला किंवा अन्य खरेदीसाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाजारात जावे.

तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच  गरीब मुस्लिम आणि हिंदू बांधवाना मदत करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

याचबरोबर कोरोनाच्या संकट काळात निर्माण झालेली परिस्थिती योग्य रित्या हाताळत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात दिवसरात्र सेवा बाजवणारे डॉक्टर, परिचारिका, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सफाई कर्मचारी, एमएसईबी कर्मचारी, बॅक कर्मचारी यांचे मुस्लिम समाजाच्यावतीने आभार मानण्यात आल्याचे सुतार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.