Akurdi : अंध कामगाराच्या थकलेल्या पगारासाठी रामदास आठवले यांनी केला कंपनी व्यवस्थापनाला फोन

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील फोर्स मोटर्स येथे काम करणाऱ्या एका अंध कामगाराचा पगार मागील दोन महिन्यांपासून थकला होता. त्या कामगाराने ही बाब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून दिली असता केंद्रीय मंत्री आठवले यांनी तत्काळ कंपनी व्यवस्थापनाला सूचना देऊन अंध कामगाराचा थकलेला पगार देण्यास सांगितले.

सुनील मदनलाल चोरडिया असे अंध कामगाराचे नाव आहे. चोरडिया मागील 41 वर्षांपासून आकुर्डी येथील फोर्स मोटर्स कंपनीत काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशानुसार कंपनी व्यवस्थापनाकडून चोरडिया यांना कामावर न येण्यास सांगण्यात आले. चोरडिया यांची पत्नी देखील अपंग आहे.

लॉकडाऊन दरम्यान चोरडिया यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. त्यात कंपनीकडून दोन महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे आणखी हाल सुरु झाले. चोरडिया यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांची भेट घेतली. रमेशन यांनी याबाबतचे एक निवेदन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिले.

केंद्रीय मंत्री आठवले यांनी या प्रकरणाची दखल घेऊन फोर्स मोटर्स व्यवस्थापनाला तत्काळ संपर्क करून चोरडिया यांचे वेतन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.