Akurdi: इंधन दरवाढ मागे घ्या; काँग्रेसचे आकुर्डीत आंदोलन

reverse fuel price hike; Congress agitation in Akurdi

एमपीसी न्यूज –  मागील सहा वर्षात ढासळलेली अर्थव्यवस्था आणि चीनने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी त्याकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकारने मागील बावीस दिवसात पेट्रोल, डिझेलची प्रचंड भाववाढ केली आहे. ही भाववाढ मागे घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल भाववाढीविरोधात सोमवारी (दि. 29) राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर डॉ. महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सेवा दलाचे राष्ट्रीय पदाधिकारी संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, विष्णुपंत नेवाळे, हिरामण खवळे, किशोर कळसकर, राजेद्रसिंह वालिया, मयुर जयस्वाल, लक्ष्मण रुपनर, शहाबुद्दीन शेख, चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, सुनिल राऊत, तुषार पाटील, मुन्सफ खान, वसिम शेख, कुंदन कसबे आदी उपस्थित होते.

डॉ. महाजन पुढे म्हणाले की, कोरोना पार्दुभाव वाढत असल्यामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे  उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑईलचे भाव कमी होत असताना मोदी सरकारने मात्र, मागील बावीस दिवसांपासून रोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे पेट्रोल आठ ते दहा रुपये व डिझेल दहा ते बारा रुपये  प्रती लिटरने वाढले आहेत.

युपीएच्या सरकारच्या काळात क्रूड ऑईलचे भाव 105 डॉलर प्रति बॅरल पर्यंत गेले असतानाही पेट्रोलचे भाव 65 रुपये प्रती लिटरपेक्षा जास्त जाऊ देले नाहीत. मात्र, मोदी सरकारने डिझेलचे भाव पेट्रोल पेक्षा जास्त केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रचंड भाववाढीचे संकट उभे राहिले आहे.

पेट्रोल, डिझेलची ही भाववाढ देशविरोधी, लोकविरोधी व लोकशाहीविरोधी आहे. याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. पेट्रोल, डिझेलची ही भाववाढ मागे घ्यावी अशी मागणी महाजन यांनी केली.

केंद्र सरकारवर टीका करताना डॉ.  महाजन म्हणाले की, विरोधकांबाबत खोटे नाटे आरोप करायचे आणि त्यांच्याबद्दल संशय निर्माण करायचा. चीन सारखा खरा शत्रू समोर उभा आहे. त्याच्या समोर मात्र शेपूट घालायचे ही पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या शौर्याची गाथा आहे.

चीनच्या घुसखोरीबाबत पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या तीन प्रश्नांचे उत्तर द्यावे, यामध्ये चीन आतापर्यंत भारतीय प्रदेशात नेमका किती आत घुसला आहे आणि किती भूभाग व्यापला आहे?.  गलवान नदीकाठी पंधरा आणि सोहळा तारखेच्या रात्री जी चकमक झाली त्यावेळेला भारतीय सैनिकांना निशस्त्र का पाठविण्यात आले?.

तसेच यासगळ्या प्रकारामध्ये राजकीय मुत्सद्देगिरी दाखविण्याऐवजी सैन्यांचा बळी का दिला? पंतप्रधानांनी बनवाबनवी बंद करुन या प्रश्नांची उत्तरे देशाला दिली पाहिजे. तसेच आजपर्यंत जी बनवाबनवी केली याबद्दल देशाची माफी मागीतली पाहिजे.

शहराध्यक्ष सचिन साठे यांनी देखील केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात निषेध व्यक्त केला. ही दरवाढ मागे घ्यावी अशी सर्व नागरिकांची मागणी आहे असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.