Aakurdi : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे गरजूंना अन्नधान्य, पोलिसांना सुरक्षिततेच्या साधनांचे  वाटप

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनच्या कालावधीत कोणीही उपाशी राहू नये, यासाठी रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे शहरातील गरजू नागरिकांना अन्नधान्यांच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सुरक्षा करणा-या पोलिसांना देखील सुरक्षिततेची साधने, फूड पॅकेट देण्यात येत आहेत.

या  बाबत रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल म्हणाले, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. हातावर पोट असणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून आम्ही मागील काही दिवसांपासून रेशनचे वाटप करत आहोत.

यामध्ये पाच किलो पीठ, तीन किलो तांदूळ, एक किलो डाळ, मीठ, मसाला असे कीट तयार करत आहोत. आकुर्डीतील दत्तवाडी, विठ्ठलवाडी भागातील गरजूंना दीडशे कीटचे वाटप केले. यावेळी आकुर्डी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे सर उपस्थित होते. भोसरीतील सुर्दशनगरमधील 125 नागरिकांना कीट दिल्या आहेत.  निगडी, ओटास्कीममधील  100 नागरिकांना आज कीट दिल्या. यावेळी निगडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड उपस्थित होते.

लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून सेवा बजावत आहेत. चिंचवड पोलिसांना दररोज 200 फूड पॅकेट दिले जात आहेत.  पोलिसांसाठी आयुष मंत्रालयाने निश्चित केलेले होमिओपॅथी औषधांच्या 500 बॉटल वाटण्यात आल्या. पोलिसांना सेफ्टी मास्क, हॅडग्लोज आणि सेफ्टी गॉगल दिले असल्याचे अध्यक्ष आगरवाल यांनी सांगितले.

यावेळी संतोष आगरवाल,  सचिन पारेख, रवी नामदे, गुल सिवलानी,  नवीन आगरवाल, प्रकाश पमनानी, विजय तारक आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.