Akurdi: मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा अन् नागरिकांमध्ये घबराट…

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाची धास्ती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतली आहे. साधा सर्दी, खोकला, थंडी, ताप आला तरी त्या व्यक्तीकडे संशयाने पाहिले जाते.  अशाच प्रकारचाच नाहक मनस्ताप आकुर्डीतील एका मेडिकल दुकानामधील कर्मचाऱ्याला झाला. त्याचे झाले असे की या कर्मचाऱ्याला थंडी, ताप आला होता; मात्र, त्याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा वा-यासारखी आकुर्डी परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. खासगी लॅबमधून तपासणी केल्यानंतर त्याला थंडी, ताप असल्याचे स्पष्ट झाले. पंरतु, या खोट्या अफवेमुळे कर्मचारी, त्याचे कुटुंबीय, मेडिकल दुकानमालकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

आकुर्डीतील एका मेडिकल दुकानामधील कर्मचाऱ्याला थंडी, ताप, सर्दी झाली होती.  या कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची तपासणी केली असता त्याचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले.  त्यानंतर महापालिकेच्या आकुर्डीतील दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे नसल्याचे सांगत नियमित औषधे दिली. त्यांनतर पुन्हा   खासगी लॅबमध्ये तपासणी करुन घेतली. त्यातही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यानंतर महापालिका अधिका-यांना देखील त्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे सांगितले.

परंतु, तोपर्यंत आकुर्डी परिसरात मेडिकल दुकानामधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. ज्या इमारतीमध्ये मेडिकल दुकान आहे. त्या इमारतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  आकुर्डी बंद ठेवण्यापर्यंत नागरिक विचार करत होते.

प्रत्यक्षात डॉक्टरांनी अधिक खोलात जाऊन माहिती घेतली असता मेडिकल दुकानामधील त्या कर्मचाऱ्याने स्वत: औषधे घेतली होती. त्याचा डोस जास्त झाला. त्यामुळे त्याच्या ‘प्लेटलेट’ कमी झाल्याने जास्त त्रास होत होता. त्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु, खोट्या अफवेमुळे हा कर्मचारी, त्याचे कुटुंबीय, मेडिकल दुकान मालकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते इकलास शेख म्हणाले, ”आकुर्डीतील एका मेडिकलमधील कर्मचाऱ्याला सर्दी, थंडी, ताप झाली होती; मात्र, या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. आम्ही या कर्मचाऱ्याची चार वेळा तपासणी केली. महापालिका अधिकाऱ्यांशी देखील सातत्याने संपर्कात होते.

चारही तपासणीत या कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. महापालिका डॉक्टरांनी कोणतीही लक्षणे नसल्याचे सांगितले. परंतु, या अफवेमुळे या कर्मचाऱ्याला, कुटुंबीयांना, मेडिकल मालकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे नागरिकांनी खात्री न करता माहिती पसरवू नये. त्याचा नाहक एखाद्याला मनस्ताप सहन करावा लागतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.