Akurdi: शास्तीकर बाधितांची उद्या बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना शास्तीकर आकारला जात आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या पुढाकाराने शास्तीकर बाधितांची उद्या (रविवारी) बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आकुर्डीतील खंडोबा माळ मंदिरा शेजारील मंगल कार्यालयात रविवारी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. शास्तीकर बाधित नागरिकांनी मिळकतकर पावती, किंवा मिळकतकर भरण्याबाबतची नोटीस प्रत्येकी दोन प्रती घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन साने यांनी केले आहे.

महापालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत बांधकामे आहेत. या अनधिकृत व वाढीव बांधकामांना महापालिकेने मिळकतकरामध्ये बेकायदेशीरपणे शास्तीकर आकारला आहे. याबाबत आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी व नागरिकांनी आंदोलने व निदर्शने केली आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात देखील शास्तीकरा माफीबाबत निर्णय घेऊ असे, आश्वासन देण्यात आले होते. मात्र, भाजप सरकारच्या कार्यकालात इच्छाशक्ती अभावी शास्तीकर माफीचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

शास्तीकराबाबत निव्वळ राजकारणच केले जाते. भाजपच्या पदाधिका-यांनी व शहरातील आमदारांनी शास्तीकर माफ केला अशी नागरिकांची दिशाभूल करून अनेकदा साखर, पेढे वाटून स्वत:ची जाहिरात करून प्रसिद्धी मिळवली. मात्र, शहरातील गोरगरीब, कष्टकरी कामगार मिळकतधारक शास्तीकर माफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या सर्व बाधितांना आता न्यायालयातूनच न्याय देऊ असा निर्धार साने यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.