Akurdi : आयसोलेशन सेंटर विरोधप्रकरणी माजी महापौरांसह आणखी तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Three others, including a former mayor, are in police custody in connection with an isolation center protest

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील आयसोलेशन सेंटरला विरोध केल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोन नगरसेवकांसह चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

नगरसेवक शरद दत्ताराम मिसाळ उर्फ राजू मिसाळ, नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्यासह योगेश बाळकृष्ण जाधव, निलेश अनिल जांभळे यांना सुरुवातीला ताब्यात घेतले होते.

त्यानंतर रावेत पोलिसांनी माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे यांचे चिरंजीव, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अनुप मोरे,  नगरसेविका शर्मिला बाबर यांचे पती राजेंद्र बाबर यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 149 अन्वये नया नगरसेवकांसह  संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे.

चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी (दि. 22) 14 नागरिकांना तिथे क्वारंटाईन केले आहे. 500 नागरिकांना तिथे क्वारंटाईन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना त्या परिसरातच क्वारंटाईन करावे.

निगडी प्राधिकरण आणि  आकुर्डीचा  काही भाग असलेल्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. त्यामुळे हा परिसर ग्रीन झोन आहे.

आमच्या ग्रीनझोनमध्ये आनंदनगरमधील  नागरिकांना क्वारंटाईन करु नये. प्रभागातील नागरिकांना त्याचा धोक निर्माण होईल, अशी भिती व्यक्त करत स्थानिक नगरसेवकांनी त्याला विरोध केला होता. तसेच आंदोलनही केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.