Akurdi : मानव कल्याणासाठी ज्ञानाचा वापर करा – डॉ. अरविंद शाळीग्राम

आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई)मध्ये पदवीग्रहण समारंभ उत्‍साहात

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी पदवी मिळविण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केले आहे. त्याचा उपयोग मानव कल्याणासाठी करावा. प्रत्‍येक दिवस तुमच्यासाठी नवी आव्हाने घेऊन येईल. या आव्हानांना धैर्याने सामोरे जा, उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करताना आपल्या देशाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपत ज्ञानाचा पुरेपुर वापर करुन मानवता जपा असे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचे आधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी क्‍वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश काळोखे, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, पीसीसीआईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्लेसमेंट विभागाचे आधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे, विविध शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, पदवी प्राप्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ऐश्वर्या निकम, हेतार्थ चोकसी, चेतन स्वकुंडे, सौरभ बेदमुथा, राज गांधी, स्वजय श्रीनाथ, साक्षी जगताप, अथर्व ठाकरे, सौरभ ढवळे या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्‍ल्‍यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

  • यावेळी शाळीग्राम म्हणाले की, मानवाने अग्निचा शोध लावला तेथूनच ख-या अर्थाने उत्‍क्रांती घडली. गेल्‍या 30 वर्षांच्या काळामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड मोठी क्रांती घडली. तंत्रज्ञानाच्या या युगात येथून पुढेही नवनवीन संशोधन होत असून त्याचा वापर दैनंदिन जीवनात होत राहील. आयुष्यात वेगवेगळे प्रश्न, नवी आव्हाने येतील. घेतलेल्‍या शिक्षणापेक्षा ही आव्हाने वेगळी असतील. परंतु विचारपूर्वक त्यांना सामोरे गेल्‍यास निश्चितच अशा आव्हानांवर मात करू शकाल. देशामध्ये स्मार्ट सिटी तयार होत आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे शहरांमध्ये सार्वजनिक आणि दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे असा होतो. भारतीय संस्कृतीला ऐतिहासिक, धार्मिक वारसा मिळालेला असून विद्यार्थ्यांनी याचा विचार करून मिळवलेल्या ज्ञानाचा आपल्‍या क्षेत्रात योग्यप्रकारे वापर करावा, असा सल्‍ला शाळीग्राम यांनी दिला.

यावेळी सतीश काळोखे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्‍हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये गेल्‍या 40 वर्षांत अमुलाग्र बदल झाले आहेत. ज्ञानाचा संचय करणे ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहिले पाहिजे. आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करताना दररोज सर्वोत्तम काम करण्यावर भर दिला पाहिजे. स्वतःविषयी अभिमान, सन्मान बाळगून आव्हानांना धैर्याने सामोरे जा. त्यामुळेच तुम्‍हाला इतरांकडून सन्मान मिळेल. प्रश्नांना कसे सामोरे जाता? यावर तुमच्या पुढील आयुष्याचा प्रवास अवलंबून आहे, असे काळोखे यांनी सांगितले.

  • पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. हरिश तिवारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. फुलंबरकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. एस. बी. माटेकर, प्रा. दिप्ती खुर्गे तर आभार सुनील ताडे यांनी मानले. कार्यक्रमास विविध विद्या शाखांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.