Akurdi, Vidyanagar News: ड्रेनेज लाईनअभावी अनेक घरांमध्ये शौचालये नाहीत, ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी

एमपीसी न्यूज – आकुर्डी, विद्यानगर प्रभाग क्रमांक 10 मध्ये महापालिकेने शौचालयासाठी ड्रेनेज लाईन टाकली नाही. त्यामुळे या भागातील सुमारे 125 घरांमध्ये शौचालय नाहीत. लहान मुले-मुली, दिव्यांग व्यक्ती, वृद्ध महिला, नागरिकांना शौचालयासाठी उघड्यावर बसावे लागते. ड्रेनेज लाईन टाकण्याबाबत पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केले जाते. महापालिकेने तत्काळ ड्रेनेज लाईन टाकून द्यावी. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घरोघरी शौचालय बांधून द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. त्यात कळसे यांनी म्हटले आहे की, विद्यानगरमध्ये एकच पट्ट्यामध्ये जवळपास 125 घरांमध्ये शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शौचालय नसल्यामुळे रात्री-अपरात्री स्वच्छालयाकरिता जायचे कुठे? असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे. विद्यानगरमध्ये स्वच्छालय ड्रेनेज लाईन टाकलेली नाही. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी महापालिकेच्या संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

महापालिकेने बांधलेली शौचालय हे बर्‍याच अंतरावर आहे. या भागात महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. शौचालयाचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ भारत अभियान राबविण्याची संकल्पना शासनाची आहे. परंतु, या भागात शौचालयासाठी महापालिकेने ड्रेनेज लाईन टाकली नाही. त्यामुळे नागरिकांना उघड्यावरच शौचालयाकरिता जावे लागत आहे. या भागातील नागरिकांच्या स्वच्छतेचा, आरोग्याचा प्रश्न विचारात घेता आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. तातडीने या परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचे काम चालू करावे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घरोघरी शौचालय बांधून देण्यात यावेत, अशी मागणी कळसे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.