Akurdi : समाजकार्य करताना जगण्याचे बळ मिळते – प्रकाश आमटे

एमपीसी न्यूज – नक्षली प्रभावक्षेत्र असलेल्या भागात काम करत असताना आदिवासी समुदायाचा विश्वास मिळवण्यासाठी आणि कुष्ठरोगी रुग्णांना प्रतिष्ठा मिळवून देताना बाबा आमटे यांचे पुरोगामी विचार मदतीला आले. समाजकार्य करताना जगण्याचे बळ मिळते हे आम्ही अनुभवले आहे, असे मत समाजसेवक डॉ. प्रकाश आमटेयांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.

डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे दाम्पत्याच्या सामाजिक कार्याबद्दल डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डीच्या वतीने डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,कुलगुरु प्रा. प्रभात रंजन, संचालक कर्नल डॉ. एस. के. जोशी आदी उपस्थित होते.

प्रकाश आमटे म्हणाले, डॉ. आमटे यांनी या वेळी बाबा आमटे यांनी उभारलेले कार्य, हेमलकसा येथील सेवाकार्याचे अनुभव कथन केले. नद्या, जंगल सुंदर वाटत असले, तरी तेथे राहणारे आदिवासी अन्न-वस्त्राविना राहतात. जे मिळेल ते खातात. मुंग्यांची चटणी कधी पाहिली आहे का ? वन्य प्राण्यासारखं त्यांचं जीवन जगणाऱ्या या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वप्न बाबांनी पाहिलं. कुठलीही तक्रार न करता आम्ही हे सर्व कार्य हाती घेतलं. मंदाकिनीची साथ मिळाली. आरोग्य व शिक्षणकार्यातून आत्मीयता मिळाली. आपल्या गरजा कमी केल्या तर जीवन बदलू शकते याची अनुभूती आली. परस्पर सख्य नसलेले प्राणी येथे एकत्रित आमच्यासोबत राहतात. प्रेम महत्त्वाचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बाबांची चौथी पिढी या वातावरणाशी जुळली आहे. जे संस्कार मिळाले त्याचा लाभ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वैविध्य, भाषा, प्रवास, नवीन गोष्टी शिकण्याची आवड हे गुण विकसित केले पाहिजेत. जीवनात पैसा दुय्यम आहे. असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आर.के. पदमनाभन यांनी व्यक्त केले.आमदार सतेज पाटील म्हणाले,  नावीन्य, सोशल मीडियाच्या काळात समाजसेवेची भावना गरजेची आहे. निस्वार्थ, निरपेक्षपणे काम कसे करायचे,प्रलोभनातून बाहेर कसे राहायचे याची शिकवण डॉ. आमटे दाम्पत्याच्या समाजकार्यातून घडते. आजच्या युवा पीढीसाठी त्यांचे कार्य महत्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.