Alandi : अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण ; विद्यार्थी आठ दिवस कोमामध्ये

अध्यात्मिक संस्थेच्या महाराजावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून आळंदी येथील एका अध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या एका अकरा वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी होऊन तो आठ दिवस कोमामध्ये गेला होता. याबाबत आळंदी येथील एका अध्यात्मिक शिक्षण संस्थेतील एका महाराजावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम राजू चौधरी (वय 11) असे जखमी विद्यार्थी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी (वय 28, रा. आंबी, ता. मावळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भगवान महाराज पोव्हणे (रा. आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कविता एका खासगी रुग्णालयात साफसफाईचे काम करतात. त्यांनी त्यांचा मुलगा ओम याला आळंदी येथील माऊली ज्ञानराज प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. मागील काही दिवसांपूर्वी आरोपी भगवान महाराज यांनी ओम याला हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये ओमच्या छातीवर, पाठीवर आणि हातापायावर गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये ओम आठ दिवस कोमामध्ये गेला होता. ओम याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत कविता यांनी फिर्याद दिली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.