Alandi : पिकांचे नुकसान करून जमिनीचा ताबा घेणा-या 65 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ऊस, ज्वारी, मका असलेल्या शेतात 65 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून पिकांचे नुकसान केले. तसेच एका शेतक-याच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर 2018 मध्ये कमळजाई वस्ती मरकळ येथे घडली.

संतोष काळुराम लोखंडे (वय 39, रा. कमळजाईवस्ती, मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आनंदा बारूक लोखंडे, शुभम मुकेश लोखंडे, अविनाश मुकेश लोखंडे, लता मुकेश लोखंडे, रवी लक्ष्मण लांडगे, नियती शिंदे (रा. आळंदी) तसेच 50 अज्ञात इसम आणि 15 तृतीयपंथी स्त्रियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमळजाईवस्ती येथे संतोष यांची शेती आहे. त्यांच्या भावकीतील आरोपींनी त्यांच्या साथीदारांना घेऊन संतोष यांच्या शेतीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. संतोष यांच्या शेतीतील ऊस, ज्वारी, मकाच्या पिकांचे त्यांनी अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान केले. आरोपींनी शेतीत जेसीबी (एमएच 12 / ईबी 1892) चालवून शेतात सिमेंटची भिंत घालून संतोष यांच्या जमिनीवर ताबा घेतला.

संतोष, त्यांची पत्नी, भाऊ, भावजय आणि पुतण्या यांनी आरोपींना भिंत घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. तर तृतीयपंथी स्त्रियांनी संतोष यांची आई, पत्नी, भाऊ आणि भावजय यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.