Alandi : ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला मारहाण करून दिले खड्ड्यात फेकून

एमपीसी न्यूज – रात्रपाळी ड्युटीवर निघालेल्या पोलीस कर्मचा-याला तीन अज्ञातांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर खिशातील किमती ऐवज काढून पोलिसाला चक्क रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी येथील रासे गावालगत घडली.

इंद्रकुमार तुकाराम धोत्रे (वय 30, रा. आळंदी) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी धोत्रे यांना रात्रपाळी असल्याने ते दुचाकीवरून आळंदी येथून चाकणकडे येत होते. दरम्यान, आळंदी घाटात अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच धोत्रे यांच्या खिशातील चार हजारांची रोकड आणि मोबाईल असा नऊ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी त्यांना रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

रस्त्याने जाणाऱ्या एका पोलिसाने धोत्रे यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडलेली बघितली. त्यानंतर धोत्रे यांचा शोध घेतला असता धोत्रे रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडलेले आढळून आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. धोत्रे यांच्यावर आता एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.