Alandi : टोळी वर्चस्वाच्या वादातून तरुणावर तलवारीने खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – अविनाश धनवेच्या गँगपेक्षा माझी गॅंग मोठी आहे, असे म्हणत तरुणावर तलवारीने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास च-होली खुर्द येथील हॉटेल रॉयल दोन येथे घडली.

सुयोग वीर आणि गणेश राजाराम थोरवे (वय 25, रा. च-होली खुर्द) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. गणेश यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुशल तापकीर, विशाल तापकीर, सोन्या घुले, उमेश दाभाडे आणि अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी गणेश त्यांचा भाचा सुयोग आणि हॉटेलमधील कामगार त्यांचे च-होली खुर्द येथील हॉटेल रॉयल दोन बंद करत होते. त्यावेळी आरोपी दोन कारमधून आले. ‘तुम्ही डुडुळगावातील तडीपार गुन्हेगार सांभाळता का, तुम्ही आम्हाला माहिती देत नाही. माझी गॅंग अविनाश धनवेच्या गॅंगपेक्षा मोठी आहे.’ असे म्हणत सुयोगच्या पाठीत तलवार खुपसली.

त्यानंतर तलवारीने त्याच्यावर वार केले. त्यामध्ये सुयोगच्या उजव्या हाताचे एक बोट तुटले. तसेच गणेश यांच्या पाठीवर हातावर वार करून दोघांना गंभीर जखमी केले. आरोपींनी शिवीगाळ करत हॉटेलची देखील तोडफोड केली. हॉटेलमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेला. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.