Alandi : किरकोळ कारणावरून भावकीत वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून भावकीत वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन मारहाण झाल्याने परस्पर विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी साडेदहाच्या सुमारास खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडली.

पहिल्या प्रकरणात 45 वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या अंगणामध्ये ठेवलेली लाकडे फेकून देत असताना फिर्यादी यांच्या मुलाने रेकॉर्डिंग केले.

तसेच 2 एप्रिल रोजी आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना दगड मारला. मात्र, फिर्यादी यांनी तो दगड हुकविला. अन्य दोन आरोपींनी शिवीगाळ करत दगडाने मारण्याची धमकी दिली. तसेच काहीजणांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ करून ही जागा आमची आहे, तुमचा या जागेत काहीही संबंध नाही, असे म्हणून मारहाण करण्याची धमकी दिली.

याच्या परस्पर विरोधात 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, तिचे पती आणि दीर असे तिघेजण उकिरड्यावरील खत शेतात टाकण्यासाठी  भरत होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये शूटिंग काढले. फिर्यादी यांनी आरोपीला शूटिंग का करतो, असे म्हटले असता आरोपीने फिर्यादी यांचा हात धरून पोटात लाथ मारली.

तसेच फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. अन्य आरोपींनी देखील फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी यांचे पती आणि सासर्‍याला देखील मारहाण केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.