Alandi: कोरोना : इतिहासात पहिल्यांदाच माऊलींचे दर्शन भाविकांसाठी बंद

एमपीसी न्यूज – जीवघेण्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यांदाच आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आजपासून ( बुधवारी ) 31 मार्चपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. यादरम्यान येणार्‍या भागवत एकादशीला भाविकांना माऊलींचे दर्शन घेता येणार नाही.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली आहेत. जगभरात थैमान घालणारा जीवघेणा कोरोना विषाणूने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव केला असून, आतापर्यंत 19 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

राज्य सरकारकडून राज्यातील अनेक महत्त्वाची देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरही दर्शनसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच दर्शन बंद करण्यात आले आहे. देवस्थानमधील भक्तनिवास, प्रसाद आणि भोजन व्यवस्थाही बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड विकास ढगे-पाटील यांनी दिली. भाविकांच्या दर्शनासाठी माऊलींचे मंदिर बंद ठेवण्यात येणार असले तरी समाधीचा अभिषेक आणि नित्यपूजा सुरू राहणार आहे.

अन्नछत्र, भक्त निवासही बंद

आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे मंदिर आजपासून 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान येणार्‍या भागवत एकादशीला भाविकांना माऊलींचे दर्शन घेता येणार नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही खबरदारी घ्यावी लागेल, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. या दरम्यान नित्य पुजा, दर्शन, अन्नछत्र, भक्त निवास सर्वकाही बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.