Alandi crime News : लग्न समारंभात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्न समारंभासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक लोकांना एकत्र करून लग्न समारंभ आयोजित केल्याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. च-होली खुर्द गावच्या हद्दीत आळंदी-वडगाव रोडवर असलेल्या नक्षत्र मंगल कार्यालयात गुरुवारी (दि. 3) विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.

संदीप तानाजी जगताप (वय 32, रा. आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या मंगल कार्यालय मालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई बाजीराव भगवान सानप यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहेत. त्याबाबत आदेश देखील देण्यात आले आहेत. लग्न आणि इतर समारंभासाठी उपस्थित लोकांची संख्या देखील प्रशासनाने ठरवून दिली आहे. लग्न समारंभासाठी 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी आहे.

आरोपी जगताप याचे च-होली परिसरात आळंदी वडगाव रोडवर नक्षत्र मंगल कार्यालय आहे. त्यामध्ये गुरुवारी एक विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या विवाहासाठी 70 ते 80 लोक एकत्र आले होते. यामुळे आळंदी पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.