Alandi : भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून टोळक्याची व-हाडावर दगडफेक

एमपीसी न्यूज – भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून दहा जणांच्या टोळक्याने वऱ्हाडावर तसेच मंगल कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये वधूची आई जखमी झाली आहे.  हा प्रकार गुरुवारी (दि. 6) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंदी येथे घडला.

लक्ष्मी भाऊसाहेब शेलार (वय 39, रा. मातोबा नगर, वाकड) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार स्वप्निल उर्फ भुऱ्या पोपट घाडगे, साहिल शिंदे, रोहित उर्फ बगळ्या, आनंद गायकवाड, अजय मगरे, अमोल लोंढे, सुकळ्या (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही), वैभव वावरे (सर्व रा. मातोबा नगर, वाकड) आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील भाग्यश्री मंगल कार्यालयामध्ये गुरुवारी वाकड येथील शेलार आणि आळंदी येथील शेट्टी कुटुंबियांचा विवाह सोहळा होता. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सर्व वर्‍हाडी मंडळी मंगल कार्यालयात जमा झाली. विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक मंगल कार्यालयाच्या बाहेर ‘भाईला फोटो काढून दिला नाही’ असे म्हणून मोठ्याने शिवीगाळ केल्याचा आवाज आला.

सर्व आरोपी आमच्या भाईला वधु सोबत फोटो काढून दिला नाही. असे म्हणून शिवीगाळ करत होती. त्या मुलांना नवरदेव पुतीन शेट्टी यांनी समजावून सांगितले आणि मंगल कार्यालयाच्या बाहेर पाठवून दिले. वऱ्हाडी मंडळी नवरदेव आणि नवरी यांना गाडीत बसवून पाठवणी करत असताना अचानक आरोपींनी मंगल कार्यालयावर आणि वर्‍हाडी मंडळींवर दगडफेक केली. त्यावेळी काही व-हाडी मंडळींनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांचे न ऐकता दगडफेक आणि शिवीगाळ सुरूच ठेवली. यामध्ये नवरी मुलीची आई लक्ष्मी शेलार या जखमी झाल्या. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.