Alandi : शेती नांगरण्यासाठी नकार देणा-या दोघांवर वार

एमपीसी न्यूज – आपल्या वाटणीची शेती नांगरण्यासाठी नकार दिल्याने तीन जणांनी मिळून नकार देणा-या दोघांना मारहाण करत चॉपरने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी साडेपाचच्या सुमारास च-होली खुर्द येथे घडली.

गणेश उत्तम पगडे (वय 27, रा. पगडे वस्ती, च-होली खुर्द, रा. खेड), नवनाथ बाळासाहेब पगडे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी गणेश यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सत्यवान गोविंद पगडे, दत्तात्रय गोविंद पगडे, परशुराम धोंडिबा गायकवाड (सर्व रा. पगडे वस्ती, च-होली खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यवान रविवारी दुपारी शेत नांगरत होता. त्यावेळी गणेश यांनी आपल्या हिश्याची शेती नांगरु नको असे सांगितले. यावरून आरोपी सत्यवान याने गणेश यांना दमदाटी करून शिवीगाळ करत वाद घातला. त्यावेळी आरोपी दत्तात्रय आणि परशुराम हे देखील तिथे आले आणि त्यांनी देखील काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

ही भांडणे सोडविण्यासाठी गणेश यांचा चुलत पुतण्या नवनाथ आला. आरोपी दत्तात्रय याने चॉपरने गणेश आणि नवनाथ यांच्यावर वार केले. यामध्ये दोघेही जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.