Alandi crime News : कंटेनरला धडकलेला दुचाकीस्वार रुग्णवाहिकेतून पळाला

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात दुचाकी चालवून विरुद्ध दिशेने येणा-या कंटेनरला धडक दिली. त्यानंतर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना तो रुग्णवाहिकेतून उतरून पळून गेला. हा प्रकार 30 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता च-होली खुर्द येथे घडला.

गजानन सोळंकी (रा. चाकण) असे रुग्णवाहिकेतून पळालेल्या जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद श्रीमंत जाधव (वय 33, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 8) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आरोपी गजानन पीसीएस कंपनी चौकाकडून च-होलीकडे दुचाकीवरून (एमएच 14 / जी डी 8824) जात होता. दुचाकी भरधाव वेगात चालवून दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने विरुद्ध दिशेने येणा-या एका कंटेनरला धडक दिली.

यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तसेच गजानन जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी गजानन अचानक रुग्णवाहिकेतून उतरून पळून गेला.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.