Alandi Crime : ग्राहकांच्या नावावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसाठी कर्ज घेऊन त्याचा अपहार करणा-या दुकानदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – फायनान्स कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी म्हणून ग्राहकांना कर्ज मिळवून घेतले. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अथवा कर्ज न देता सर्व रक्कम स्वतः वापरली, असा प्रकार करणा-या एका दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज विजय जगताप (रा. बहिरट चाळ, आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याबाबत धनंजय राजाराम सागवेकर (वय 40) यांनी गुरुवारी (दि. 15) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होम क्रेडीट इंडिया फायनान्स या कंपनीत फिर्यादी काम करतात. तर आरोपी मनोज याचे आळंदी येथे माउली इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. मनोज याने दिलीप नागोराव खंदारे (रा. सोळू, ता. खेड) या ग्राहकाला एलईडी टीव्ही खरेदी करण्यासाठी 33 हजार 284 रुपये, सुधाकर ज्ञानोबा ढवळे (रा. आळंदी) याला एलईडी टीव्ही खरेदी करण्यासाठी 29 हजार 884 रुपये, विनोद अजबराव बोंडे (रा. च-होली रोड, आळंदी) या ग्राहकाला टीव्ही खरेदीसाठी 32 हजार 884 रुपये, राहुल सुभाष शिरसाठ (रा. आळंदी) या ग्राहकाला टीव्ही खरेदी करण्यासाठी 32 हजार 884 रुपये आणि वैभव जगन्नाथ कस्पटे (रा. वडगावरोड, आळंदी) या ग्राहकाला टीव्ही खरेदी करण्यासाठी 30 हजार 884 रुपयांचे कर्ज फिर्यादी यांच्या होम क्रेडीट इंडिया फायनान्स प्रा. ली. या फायनान्स कंपनीकडून मंजूर करून घेतले.

प्रत्यक्षात दुकानदार आरोपी मनोज याने ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू न देता कर्जाची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. दुकानदार मनोज याने फायनान्स कंपनीची एक लाख 59 हजार 820 रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.