Alandi : शालेय पोषण आहारात अंडीचा समावेश करू नका; तुषार भोसले यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत (Alandi) भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शालेय पोषण आहारात देण्यात आलेल्या अंडी आहाराचा विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील दिले आहे.

तुषार भोसले म्हणाले, कि महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागात  7 नोव्हेंबर 2023 रोजी मुलांना प्रोटीन मिळावे यासाठी आहारात अंडीचा समावेश करण्यात आला. पण, प्रत्येकाच्या कुटुंबाचे काही नियम असतात. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा घराघरात आहे. महानुभाव पंथ आहे. अनेक अध्यात्मिक संप्रदाय व जैन संप्रदाय आहे. प्रत्येकाच्या कुटुंबाचे ठरलेले नियम असतात. आणि अशा वेळी आपला पाल्य शाळेत शिकत असतो. त्याच्याकडून अजाणतेपणाने अंडी खाल्याने त्यांचाकुटुंबाचा असलेला शुद्ध शाकाहारी नियम मोडण्याचा धोका या समाजघटकांना सतावत आहे. या निर्णया विरोधात अनेक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे

तुषार भोसले पुढे म्हणाले, कि हा निर्णय तत्काळ रद्द करावा. अंडीला अनेक गोष्टी पर्याय असू शकतात. देशी गाईचे दूध आहे, तूप, सुकामेवा आहे. अन्य पर्याय असू शकतात. अंडी हा पर्याय असू शकत नाही. मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे तत्काळ हा निर्णय रद्द केला पाहिजे. संप्रदाय, जैन संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील आध्यत्मिक क्षेत्रातील मान्यवरांची तीच भावना आहे. मला आशा आहे माननीय मुख्यमंत्री राज्याच्या वारकरी संप्रदायाचा आणि एकूणच आध्यत्मिक क्षेत्राचा साधू संतांचा भावनांचा सन्मान करतील हा निर्णय मागे घेतील.

प्रकाश महाराज जवंजाळ यांनीही शालेय विभागाने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शविला. आहारात अंडी व्यतिरिक्त अन्य शाकाहारी (शेंगदाणे, गूळ, काजू, बदाम, दूध व इतर) पदार्थांच्या पर्यायाचा समावेश करावा असे त्यांनी सांगितले. तसेच  हा निर्णय 20 तारखेपर्यंत रद्द केला नाही तर शुद्ध शाकाहारी पद्धतीने चालणारे जे संप्रदाय आहेत ते या अंड्याच्या गाड्या पुढे जाऊ देणार नाहीत. अंडे कुठे फुटले; कुठे गेली हे सरकारला सुद्धा कळणार नाही. 20 तारखेपर्यंत निर्णय मागे घ्यावा. अन्यथा संबंधित संप्रदाय आंदोलनात उतरतील. 

या सरकारमध्ये तुम्ही आहात? पत्रकारांचा सवाल! 

त्यावेळी ते म्हणाले सरकारमधील आम्ही एक भाग आहोत. सरकारची भूमिका वेगळी असू शकते. सरकारने जो काही हा निर्णय घेतला आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही. हा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे. आमच्या मागणीचा शासन (Alandi) निर्णय घेईल. सरकार हे संवेदनशील आहे. सरकार हा निर्णय पूर्णपणे मागे घेईल आशा आहे. नाही घेतला तर त्या क्षेत्रातील मान्यवरांशी बोलून योग्य ती दिशा ठरवू.

आम्ही त्या भूमिकेशी सहमत

यात्रा काळात ग्रामस्थांनी बंद पुकारला व विश्वस्त पदापासून त्यांना डावलले जात आहे. प्रतिनिधित्व दिले जात नाही, त्या भूमिकेबद्दल पत्रकारांनी भोसले यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले कि आळंदीकरांची भूमिका रास्त आहे. प्रत्येक देवस्थानामध्ये स्थानिक प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. आम्ही त्या भूमिकेशी सहमत आहोत. मात्र आताच झालेला निर्णय हा तिथल्या प्रधान न्यायाधीशांनी दिला आहे. त्यामुळे त्यावर टिप्पणी करणे अयोग्य आहे.

तसेच यावेळी इंद्रायणी नदी प्रदूषणा बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तुषार भोसले म्हणाले, इंद्रायणी असो वा चंद्रभागा हे वारकऱ्यांचे तीर्थ आहे. ते शुद्ध असलेच पाहिजे अशीच आमची भावना आहे. सरकारमध्ये असल्याने पूर्णपणाने इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणाच्या बाबतीत आणि चंद्रभागेच्या शुद्धीकरणाच्या बाबतीत नमामी गंगेच्या प्रमाणे नमामी चंद्रभागा, नमामी इंद्रायणी या प्रकल्पासाठी काम करत आहोत. राज्य शासनाने 4 जुलैला त्याबाबत आराखडा राज्यशासनाने मंजूर करून केंद्र
सरकारकडे पाठवला आहे. केंद्र सरकारने त्या सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे. पुढच्या कुठल्याही क्षणात संपूर्ण इंद्रायणीच्या शुद्धीकरणाच्या आराखड्याला मंजुरी मिळेल. ती मंजुरी मिळाली की आपली इंद्रायणी पूर्णपणे शुद्ध होईल.

यावेळी भाजपचे पदाधिकारी संजय घुंडरे, राम गावडे, आकाश जोशी व वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. (Alandi)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.