Alandi : घरगुती वादातून सासू-सुनेची परस्पर विरोधी तक्रार

एमपीसी न्यूज – घरगुती वादातून सासूने सुनेवर आणि सुनेने सासूवर परस्पर विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार च-होली रोड आळंदी येथे घडला आहे.

सपना किशोर वाढे (वय 32, रा. च-होली रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दीर विश्वनाथ वसंत वाढे (वय 35), जाऊ आरती विश्वनाथ वाढे (वय 28), सासू सरला वसंत वाढे (वय 55) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सपना यांच्या पतीने एक गुंठ्यामध्ये बांधलेले घर आरोपी विश्वनाथ याच्या नावावर करून देण्यासाठी जाऊ व सासू यांनी दबाव आणला. तसेच हाताने मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. जाऊ आरती हिने सपना यांच्या हाताला चावा घेऊन शिवीगाळ केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात सासू सरला यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सून सपना किशोर वाढे (वय 32) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास सरला यांचा नातू विहान याने घरचे गेट उघडले. ते गेट सपना हिच्या किराणा दुकानातील कुरकुरेच्या पाकिटाला लागले. त्यावरून सपनाने विहानला मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी सरला यांची दुसरी सून आरती गेल्या असता त्यांना सपनाने चावा घेतला. जावाजावांची भांडणे सोडवण्यासाठी सरला गेल्या असता सून सपनाने फिर्यादी सासू सरला यांना देखील मारहाण केली. तसेच मुलगा विश्वनाथ यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.