_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Alandi Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; 16 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून 16 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर  दगड, विटा, सिमेंट ब्लॉकने मारहाण करून 16 जणांनी जखमी तरुणाला लाथांनी तुडवले.  ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी आळंदीमधील केळगाव चौक आणि चाकण चौकात घडली.

महादेव विष्णू देवकाते (वय 24, रा. लक्ष्मीनगर, च-होली खुर्द, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी माऊली डहाळे, अक्षय नाईक, अजय देवरस, सोन्या गोटकुले, शाम विटकर, सागर खिल्लारे, तेजस गालफाडे, सुरज गालफाडे, शिवा अक्कलवाड (सर्व रा. आळंदी, ता. खेड) आणि त्यांचे पाच ते सात मित्र यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 143, 147, 148, 149, 188, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), सह 135 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीला रविवारी सायंकाळी  साडेपाच वाजता आळंदी येथील केळगाव चौकात गाठले. ‘तुला खल्लासच करतो’ असे म्हणून आरोपींनी दगड, विटा, सिमेंट ब्लॉकने महादेव यांना मारहाण केली.

यामध्ये महादेव यांच्या डोक्यात, हात, पायावर, पाठीवर, पोटावर गंभीर दुखापत झाली. मारहाण होत असताना महादेव खाली पडले असता आरोपींनी महादेव यांच्या अंगावर नाचून त्यांना तुडवून परिसरात दहशत निर्माण केली. महादेव यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.