Alandi: सासरा आणि मेव्हण्याकडून जावयाचा निर्घृणपणे खून

Alandi: father-in-law killed son in law च-होली गावच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे संजय एकनाथ आहेर यांच्या घराच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत गाठले.

एमपीसी न्यूज – कौटुंबिक कारणांवरून पत्नीशी भांडण झाले. या कारणावरून सासरा आणि मेहुणा या दोघांनी मिळून जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार च-होली गावाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास च-होली येथे संजय एकनाथ आहेर यांच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत घडली आहे.

उदय लोखंडे (वय 35) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. उदय यांच्या वडिलांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरा हनुमंत ज्ञानोबा सोनवणे, किरण हनुमंत सोनवणे (रा. कोंडीत, ता. पुरंदर. सध्या रा. भैरोबा नाला, हडपसर) आणि इतर नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उदय आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणांवरून भांडण होत होते. उदयला दारूचे व्यसन होते. त्यावरूनही पती-पत्नीमध्ये भांडण होत होते. उदयची पत्नी आणि आरोपी यांचे म्हणणे होते की, उदय आणि त्याच्या पत्नीने वेगळे राहावे.

दरम्यान, वारंवार होत असलेल्या भांडणावरून आरोपींनी बुधवारी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास च-होली गावच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे संजय एकनाथ आहेर यांच्या घराच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत गाठले.

त्यांनी उदय यांच्यावर कठीण हत्याराने हल्ला केला. उदय यांच्या डोक्यात, हातापायावर, पाठीवर, कानाजवळ गंभीर दुखापत करून त्यांचा निर्घृणपणे खून केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 आणि 34 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.