Alandi : बैलगाडा शर्यतींचे आयोजन करणा-या चार आयोजकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे उल्लंघन करून चौघांनी मिळून आळंदी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. याबाबत चौघांवर प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पप्पू हरिभाऊ लोखंडे, अजित भुसे, भाऊ भुसे (सर्व रा. मरकळ, ता. खेड) आणि अन्य एकजण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ कारभारी कु-हे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने 7 मे 2014 रोजी बैलगाडा शर्यतीवर बंदीचा निर्णय दिला आहे. या निर्णयाला डावलून आरोपींनी मरकळ-कोयाळी रोडवरील आराध्य हॉटेलच्या मागील बाजूस जंगलातील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले.

याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आयोजकांवर प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम 1960 च्या कलम 11 आणि भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.