Alandi : शेतीच्या वाटणीवरून भावकीत तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – शेतीच्या वाटणीवरून भावकीत तुंबळ हाणामारी झाली. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी घडली.

गोरख सुदाम कोळकर (वय 40, रा. कोयाळी, त. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी योगेश मारुती कोळकर, मच्छिंद्र कोळकर, मालन मारुती कोळकर (सर्व रा. कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना लोखंडी रॉडने डोक्यावर व पाठीवर मारहाण करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. ते उपचारासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयात गेले. उपचार सुरु असताना आरोपी योगेश याने रुग्णालयात येऊन फिर्यादी यांना ‘तुला  लय  माज आलाय का’, असे म्हणून रुग्णालयातील सलाईन लावण्याच्या लोखंडी स्टॅंडने मारून आणखी जखमी केले. तर मच्छिंद्र व मालन यांनी फिर्यादी यांना ‘तुला जिवंतच ठेवत नाही’ असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात योगेश मारुती कोळकर (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गोरख सुदाम कोळकर, भाऊसाहेब सुदाम कोळकर, लीलाबाई सुदाम कोळकर, कासुबाई गोरख कोळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद घालत फिर्यादी यांच्या आईला खो-याने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या आईच्या पायावर, हातावर, छातीवर इजा झाली. त्यावेळी फिर्यादी आईला सोडविण्यासाठी गेले असता आरोपी भाऊसाहेब याने फिर्यादी यांना काठीने मारहाण केली. तर आरोपी लीलाबाई आणि कासुबाई यांनी फिर्यादी यांच्या आईला मारहाण केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.