Alandi : ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ कार्यक्रमाद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगरपरिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ कार्यक्रमाद्वारे आळंदी घाटावरच्या रक्षा विसर्जन स्तंभ येथे आज (दि.१२) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रत्यर्थ आळंदीत उभारण्यात आलेल्या रक्षा विसर्जन स्तंभ येथे राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित डॉ कुमार सप्तर्षी यांनी रक्षा विसर्जन स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आळंदी नगरपालिकेच्या वतीने किशोर तरकसे, आळंदी काँग्रेस कमिटीच्या वतीने नंदकुमार वडगावकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले होते. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले होते.त्याची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला.

कार्यक्रमप्रसंगी गांधीजींची आवडती भजने आणि प्रार्थनाचे शुभांगी मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गायन केले.कार्यक्रमाचे व निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी अहिंसा, सत्य, सर्वधर्म, समानता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या द्वेषमुलक वातावरणात महात्मा गांधी यांचे विचार समाजाला तारु शकतील असे वक्तव्य त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.