Alandi News : आळंदी- मरकळ -लोणीकंद रस्त्यावर पावसामुळे पुन्हा खड्डे

एमपीसी न्यूज – आळंदी – मरकळ – लोणीकंद रस्त्याची व  मरकळ – तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पूलाच्या रस्त्याची फारच दुर्दशा झालेली आहे.

मागील जुलैत झालेल्या मुसळधार पावसामुळे तर या रस्त्याची फारच बिकट अवस्था झाली होती. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले होते.त्यावेळेस  खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी या रस्त्याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) पुणे या कार्यालयास त्यांनी पत्राद्वारे कळविले होते. आळंदी – मरकळ रस्त्याच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र तांत्रिक प्रक्रिया होऊन हे काम सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे.

सध्या या परिसरात संततधार पाऊस पडत आहे.त्यामुळे आधीच दुरावस्था झालेल्या रस्त्यावर आणखी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मंजूर असलेले रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून आवश्यक तेथे रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. तरी आपण लक्ष घालून आळंदी मरकळ लोणीकंद रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे तसेच आवश्यक तेथे रस्त्या दुरुस्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी.अश्या आशयाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) पुणे या कार्यालयास दिले होते.तत्पर त्या विभागाने त्याच महिन्यात आळंदी मरकळ लोणीकंद या रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचे काम केले होते.

सध्या ऑगस्ट महिन्यात  या भागात संततधार पाऊस सुरू असल्याने आळंदी मरकळ लोणीकंद या रस्त्यावर जगोजागी पुन्हा लहान मोठे खड्डे पडून दुरावस्था झाली आहे.त्यामुळे दुचाकीसह इतर वाहनांना देखील ये–जा करणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे येथील रस्त्यावर प्रवास करणारे  स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणारे वाहन चालक प्रवासी त्रासलेले असून त्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

धानोरे ते लोणीकंद फाट्यापर्यंत ठीक ठिकाणी औद्योगिक कंपन्या असल्याने जड व अवजड वाहनांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यात या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीची  मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे.तसेच मरकळ तुळापूर पुलावरील रस्त्यावर पुन्हा खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.शासनाने हा पूल कमकुवत पूल म्हणून जाहीर केला आहे. परंतु या भागात औद्योगिक कंपन्या असल्याने या पुलावरून अवजड वाहने सर्रासपणे वाहतूक करत असतात.

आळंदी – मरकळ – लोणीकंद रस्ता  व इंद्रायणीवरील मोठ्या पुलाच्या सुधारणेसाठी निधी मंजूर झाला आहे. तांत्रिक प्रक्रिया होऊन हे काम सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे,अशी माहिती गेल्या महिन्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.