Alandi : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या प्रतिक देशमुख अन् प्रतिक येवले यांनी पटकाविले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आळंदी येथे झालेल्या 39 व्या कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत युवा राष्ट्रीय कुस्तीगीर प्रतिक शंकर देशमुख याने 92 किलो वजनी गटात तर मल्ल प्रतिक शिवाजी येवले याने 55 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच राष्ट्रीय महिला कुस्तीगीर समृध्दी मुकुंद भोसले हिने 22 व्या वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आळंदी देवाची येथील ज्ञानदीप धर्मशाळेत ३९ वी कुमार राज्य अजिंक्यपद व २२ वी वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवामल्ल प्रतिक शंकर देशमुख याने कुमार विभागात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकरात ९२ किलो वजनीगटात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले आहे. प्रतिकने चार राष्ट्रीय स्पर्धांपैकी तीन स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. प्रतिक हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे घेत आहे. त्याला वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे, किशोर नखाते, नरेंदर कुमार, सदानंद, दिलीप पडवळ, निलेश पाटील, परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

प्रतिक शिवाजी येवले हा गोडूंब्रे गावचा असणारा युवामल्ल यानेही ३९ व्या कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिलेच सुवर्णपदक पटकावले आहे. प्रतिक येवले हा खेड तालुक्यातील कुरूळी येथे पै. दिपक डोंगरे व कुस्ती मार्गदर्शक संजय दाभाडे यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत आहे.

पाटण गावची राष्ट्रीय महिला कुस्तीगीर समृध्दी मुकुंद भोसले हिने २२ व्या वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले असून, समृध्दीने यापूर्वी राज्य, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदकांची कमाई केली असून, जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही पदक पटकावले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.