Alandi : आळंदीमध्ये वैद्यकीय कचरा उघड्यावर; नागरिकांसह जनावरांच्या जीवाशी खेळ

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण रुग्णालयामार्फत त्या (Alandi) रुग्णालयातील वैद्यकीय कचरा हा घनकचरा संकलन करणाऱ्या गाडीत टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच रुग्णालयाच्या जवळील परिसरात वापरले जाणारे इंजेक्शनसुद्धा उघड्यावर पडलेले दिसून येतात. या प्रकारामुळे नागरिकांसह सफाई कर्मचारी व जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

वापरलेले इंजेक्शन, सलाईन बॉटल, सुया, कापूस, औषधांच्या बाटल्या, हॅन्डग्लोज, डायपर, जखम साफ करण्यासाठी वापरण्यात आलेले कापूस असा विविध प्रकारचा जैव वैद्यकीय कचरा एकत्ररित्या शहरातील घनकचरा घंटा गाडीमध्ये दिला जात आहे. या वैद्यकीय कचऱ्यामुळे मानवी पशू-पक्षी यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असतात.

त्यात संसर्गजन्य रोगीही असतात. त्यांना वापरण्यात आलेले वैद्यकीय साधने आणि वस्तूही कचऱ्यात जात असतात. त्यामुळे संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ शकतो. तसेच तो कचरा उघड्यावर पडत असेल तर तो पशू ,पक्षी (कोंबडी) यांच्या खाण्यात  कचरा आला, तर त्यांचे मांस खाणाऱ्या व्यक्तीच्या किंवा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. श्वसनासंदर्भातील अनेक आजार उदभवू शकतात. लहान मुलांच्या हातात पडल्यास त्यांना अपाय होऊ शकतो.

Pune Police : तोतया पत्रकारांना खंडणी घेताना रंगेहात अटक; पोलिसांकडून गोळीबार

यासंदर्भात मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, की जैव वैद्यकीय कचरा हाताळणी नियम 2016 ,पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 याला अनुसरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजुरी दिलेल्या प्रक्रिया केंद्रावर पोहचविण्याची जबाबदारी रुग्णालयाची असते. यासाठी करार केलेल्या संबंधित प्रायव्हेट एजन्सी (Alandi) मार्फत वाहने येतात. त्या वाहनांमध्ये वर्गीकरण करून तो कचरा द्यायचा असतो. तो कचरा प्रक्रिया केंद्रावर जातो. तो जर कचरा आपल्या (नागरिकांच्या साधारण) कचऱ्यामध्ये टाकला तर 5 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 1 लाख पर्यंतचा किंवा दोन्ही दंडाची तरतूद आहे.

आळंदी ग्रामीण रुग्णालयाला त्या संदर्भात नोटीस देऊन त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. जैव वैद्यकीय कचरा हाताळणी नियम 2016 प्रमाणे योग्य त्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.