Alandi : मोती आणि हिरा पालखी सोहळ्यासाठी शाही थाटात रवाना

माऊलींच्या अश्वाचे अंकलीतून अलंकारपुरीकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज – माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वैभव असलेला श्रींचा मोती आणि अश्व तसेच मानाचा जरीपटक्याचा हिरा या अश्वांचे अलंकारपुरीतील सोहळ्यासाठी अंकली (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) येथून श्रीमंत उर्जिसिंह शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून हरिनाम गजरात प्रस्थान झाले.

श्रींचा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हा मानाचा अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे 300 किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करुन अलंकारपुरीत 24 जून रोजी दाखल होतील. पालखी सोहळ्याच्या वैभवात वाढ करणा-या अश्वांचे प्रस्थान झाल्यानंतर अंकलीत ग्रामप्रदक्षिणा, महाप्रसाद उत्साहात झाला.

  • अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात नऊच्या सुमारास अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली. यावेळी जरीपटक्याचे पूजन कऱण्यात आले. अश्वांची श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

दिंडी व श्रींचा अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून औक्षण केले. श्रींचे अश्व दर्शनास भाविक, नागरिकांनी यावेळी गर्दी केली. अंकली गावांतून प्रथा परंपरांचे पालन करीत पारंपारिक मार्गावरुन अश्व मिरवणुक वेशीत आल्यानंतर अश्वांना नामगजरात निरोप देण्यात आला.

  • श्रींचे अश्व प्रस्थानप्रसंगी आळंदीहून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार, ज्ञानेश्वर गुळुंजकर, सत्यवान बवले, संजय बवले, अजित मधवे, पुणे येथुन शंकर मोकाटे, विजय मोकाटे, सचिन तिकोणे, राजाभाऊ थोरात, मोरेश्वर गायकवाड, अतुल नाझरे, बसवप्रसाद जोल्ले, शिवराज जोल्ले, अश्वत्थ शितोळे सरकार, तुकाराम पाटील, संजय चौधरी, विवेक कपते आदींसह अंकली, जुगुळ, चंदुर, मांजरीवाडीतील भाविक, वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.