Alandi News: भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने मामा, भाच्याची 77 लाखांची फसवणूक

फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली असता 'तुमची गुंतवलेली रक्कम परत देतो, तुमची भागीदारी काढून घ्या' असे म्हणून पैसे व मोबदला देण्यास टाळाटाळ केली.

एमपीसी न्यूज – भागीदारीत व्यवसाय करू, असे आमिष दाखवून दोघांनी मिळून मामा आणि भाच्याची फसवणूक केली. याबाबत भाच्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2019 पासून 3 मार्च 2020 या कालावधीत खेड तालुक्यातील धानोरे येथे घडला.

अविनाश सुधाकर थिटे (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल रमेश खारोळे, अर्चना अमोल खारोळे (दोघे रा. मरकळ रोड, च-होली खुर्द, ता. खेड) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अविनाश आणि त्यांच्या मामाशी संपर्क केला. मामा आणि भाच्याचा विश्वास संपादन करून मे. खारोळे पाटील मॅन्युफ्रॅक्चरिंग इंडस्ट्रीज ओपीसी प्रा. लि. धानोरे या कंपनीत आणि दुसरी कंपनी स्टीलनेटीक इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीची स्थापना करून त्यामध्ये समान भागीदारी करण्याचे आमिष दाखवले.

व्यवसाय करण्याच्या बहाण्याने फिर्यादी आणि त्यांच्या मामाकडून आरोपींनी विकसनासाठी व व्यवसायासाठी 77 लाख 70 हजार 546 रुपये घेतले. फिर्यादी यांनी गुंतवलेल्या रकमेचा कोणताही मोबदला त्यांना दिला नाही.

त्याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली असता ‘तुमची गुंतवलेली रक्कम परत देतो, तुमची भागीदारी काढून घ्या’ असे म्हणून पैसे व मोबदला देण्यास टाळाटाळ केली.

फिर्यादी अविनाश आणि आरोपी अमोल यांचे एका बँकेत जॉईंट खाते आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या परस्पर बनावट सही करून त्या खात्यावरून पैसे काढून घेत फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.