Alandi News : वृद्ध आई-वडिलांना आळंदीत सोडून देण्यासाठी ते रिक्षा घेऊन आले होते पण…

एमपीसीन्यूज : जन्मदात्या आई वडीलांमुळे घरात भांडण होत असल्यामुळे आणि त्यांच्या वेडसरपणाचा त्रास होत असल्यामुळे रिक्षाचालक असलेली त्यांची दोन मुलंच त्यांना आळंदीत कायमचे सोडण्यासाठी रिक्षात घेऊन आली होती. परंतु, काही सजग नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर या नागरिकांच्या दबावामुळे त्या मुलांना आपल्या आई-वडिलांना पुन्हा एकदा घरी परत न्यावे लागले. याविषयीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्याच्या मांजरी परिसरात राहणारे हे दोन भाऊ रिक्षा चालक आहेत. आईवडिलांना कायमचे सोडून देण्यासाठी ते त्यांना घेऊन आळंदीत आले होते. घरात सतत भांडण करतात, त्रास देतात, त्यांच्या वेडसरपणाचा आम्हाला त्रास होतो, त्यामुळे आम्हाला त्यांना सांभाळायची नाही, असं हा मुलगा त्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतोय.

_MPC_DIR_MPU_II

हा सर्व प्रकार होत असताना त्या आई वडिलांच्या तोंडून मात्र एक शब्दही फुटत नव्हता. स्थानिक नागरिकांनी त्या वृद्ध महिलेला विचारले असता तिने आम्हाला तुम्ही आळंदीत राहा असे सांगून या ठिकाणी आणल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक नागरिकांपैकी एकाने या मुलाला चांगलेच खडसावले. मात्र, त्याच वेळी त्या वृद्ध आई पुढे आली आणि मुलांना काही न बोलण्याची विनंती केली.

बराच वेळ हा सर्व प्रकार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या दबावापुढे त्या मुलांना आई-वडिलांना घरी घेऊन जावे लागले. ज्या रिक्षातून आले त्याच रिक्षाने ते पुन्हा घराकडे गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.