Alandi News : क्लोराईड मेटल्समधील कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी प्रयत्न करु : गजानन राणे

एमपीसीन्यूज : क्लोराईड मेटल्समधील कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच आगामी काळात कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन या कंपनीतील सर्व कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी दिले.

आळंदी जवळील मरकळ ( ता. खेड ) एमआयडीसीतील क्लोराईड मेटल्स या कंपनीतील कायम कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या नामफलकाचे अनावरण गजानन राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळ असलेल्या छोटेखानी द्वारसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्यासह प्रतीक राणे, राज पार्टे, अण्णासाहेब लोखंडे, कृष्णा मोहिते, मनसेचे पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख अंकुश तापकीर तसेच महादेव शेळके, विशाल रौधळ, संजय झोडगे, गणेश अवचर, करण टेंगळे , नवनाथ बारणे, सोमनाथ करंजकर, विकास शेळके, विक्रम दाभाडे आदी कामगार उपस्थित होते.

राणे पुढे म्हणाले, कामगारांना कामावरून काढून टाकण्यासाठी किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी कामगार कायद्याचा वापर कंपनी व्यवस्थापनाकडून केला जात असेल तर अशा कंपन्यांना कामगार कायदा शिकविण्याची वेळ आली आहे. ‘क्लोराईड’मधील कायम कामगारांच्या वेतन करारावर लवकरच कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यात येईल. या चर्चेत वेतन कराराचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

दरम्यान, यावेळी गजानन राणे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने क्लोराईड मेटल्स कंपनीचे जनरल मॅनेजर राजीव दत्ता, पर्सनल मॅनेजर संजय मोकाशी आणि उत्पादन विभागाचे अधिकारी शांताराम मोलावडे यांची भेट घेत कामगारांच्या मागण्या आणि विविध प्रश्नांनावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.