Alandi News : आळंदी-भेकराईनगर मार्गावरील एलटीडी बससेवा सुरू

एमपीसी न्यूज – लांब पल्ल्यांच्या मार्गावर महत्त्वाचे मर्यादित थांबे असणारी जलद बससेवा (एलटीडी) सुरू करण्याचा निर्णय ‘पीएमपी’ने घेतला आहे. मुंबई येथील बेस्ट आणि जलद रेल्वेच्या धर्तीवर ही सेवा सुरू करण्यात आली असून इलेकट्रीक वातानुकूलीत गाड्या या मार्गावर धावणार आहेत. या सेवेला आज शुक्रवारपासून (दि. 25) सुरुवात झाली.

आळंदी ते भेकराईनगर या मार्गावरील या बसचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक डी. डी. भोसले, आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, भोसरी आगार व्यवस्थापक रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कामगार नेते अरूण घुंडरे, भोसरी BRT बसस्थानकचे प्रमुख काळुराम लांडगे, वरिष्ठ लिपीक बापू ज्ञानेश्वर रायकर, सुनिल प्रभाकर चव्हाण, दिपक ओव्हाळ, आळंदी बसस्थानक प्रमुख राजाराम सुदाम काळजे, सुरेश संभाजी बनसोडे होते. कार्यक्रमाचे आयोजन सुभाष भोसले, भरत काळजे, कुंदन काळे, सैफ पठाण यांनी केले.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचविणे, निश्चित स्थळी नियोजित वेळेत पोहोचणे आणि बस सेवेचा वेग वाढविणे या सेवेतून साध्य होणार आहे. या सेवेसाठी वातानुकूलीत गाड्या देण्यात येणार आहे. मात्र, तिकीट दर सध्याचेच असतील.

कात्रज-निगडी, निगडी -पुणे स्थानक, निगडी-वाघोली-केसनंद फाटा, निगडी-हिंजवडी माण फेज-3, भेकराईनगर-हिंजवडी माण फेज-3, भेकराईनगर-आळंदी, भेकराईनगर-चिंचवडगांव, भेकराईनगर-निगडी, शेवाळवाडी- निगडी, भेकराईनगर-एनडीए गेट, भेकराईनगर-कात्रज अशा 11 मार्गांवर ही सेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील गाड्यांसाठी मर्यादित बसथांबे असतील.

मार्गावरील गाड्यांची वारंवारिता 25 मिनिटापासून 65 मिनिटांपर्यंत असेल. सध्या 11 मार्गांवर प्रायोगिक तत्त्वावर सेवा देण्यात येणार असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.