Alandi News : सुरक्षित वाहतुकीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची ‘वाहतूक जनजागृती दिंडी’

एमपीसी न्यूज – रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने आळंदी येथे मंगळवारी (दि. 16) जनजागृतीपर वाहतूक दिंडी काढण्यात आली. यात पिंपरी चिंचवड शहर पोलीस, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला.

32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत काढलेल्या आलेल्या वाहतूक दिंडीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, शरदचंद्र पवार कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर थोरात, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिपक मुंगसे, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे व महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिक उपस्थित होते.

वाहतूक जनजागृती दिंडीची सुरुवात सकाळी 11 वाजता फुटवाले धर्मशाळा आळंदी येथून झाली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, एनएसएसचे स्वयंसेवक, इतर सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या.

विद्यार्थ्यांनी हातात वाहतूक नियमांचे पोस्टर्स व बॅनर्स घेऊन जनजागृती केली. तसेच जनजागृती रथ, पालखी, बैलगाडी, लेझीम पथक, भजनी मंडळ इत्यादी माध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात आली.

दिंडीचा समारोप फ्रुटवाले धर्मशाळा सभागृह येथे झाला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या वाहतूक विषयक निबंध लेखन, चित्रकला, पोस्टर स्पर्धामधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत संत साहित्यातील विविध उदाहरणे, दाखले देऊन जनजागृतीपर मार्गदर्शन केले.

सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांनी वाहतूक शाखेकडून 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 दरम्यान राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.