Alandi News : स्नेहवनचा फिरता दवाखाना सुरू ; ‘सेन्चुरी इन्का’कडून रुग्णवाहिका भेट

एमपीसी न्यूज – स्नेहवन या संस्थेमार्फत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. यासाठी ‘सेन्चुरी इन्का’ कंपनीकडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. स्नेहवनच्या उपाध्यक्षा डाॅ. स्मिता कुलकर्णी आणि डाॅ. रविंद्र कुलकर्णी मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश सोडानी, मुख्य वित्त अधिकारी कृष्णगोपाल लाडसरिया, उपाध्यक्ष एच आर जगनाथ प्रसाद, निलेश लिमये, स्नेहवनचे मार्गदर्शक डॉ. रवींद्र कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. ‘सेंचुरी एन्का’ मागील दोन वर्षांपासून स्नेहवन संस्थेसोबत जोडली गेली आहे. फिरत्या दवाखान्यासाठी लागणारी रुग्णवाहिका कंपनीने संस्थेला दिली आहे. यासाठी निलेश लिमये यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘स्नेहवन’ संस्था गेली पाच वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनाचे काम करते. आळंदीपासून 8 किमी अंतरावर असलेल्या कोयाळी गावात मुलांचा निवासी प्रकल्प संस्थेमार्फत चालवला जातो. आळंदी जवळील ठाकरवाडीत आणि इतर भागात आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी स्नेहवनचा ज्ञानछत्र प्रकल्प चालतो. सदर भागात बऱ्याच आरोग्याच्या समस्या आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्यांवर काम करत, आरोग्य बाबतीत जनजागृती तसेच, मुली व महिलांच्या विविध समस्यांवर काम करायचे संस्थेने ठरवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.