Alandi News: नगराध्यक्षांच्या पतीचा कामकाजातील हस्तक्षेप थांबवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषदेच्या भाजपकडून निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या पतीचा परिषदेच्या कामकाजात होणारा हस्तक्षेप त्वरित थांबवावा, असा आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल पाठविण्याचा आदेश ही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा यांचे पती नगरपरिषद कामकाजात हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. चौकशीत नगराध्यक्षा यांचे पती नगरपरिषदेच्या कामकाजामध्ये सहभाग घेत असल्याचे दिसून येत आहे.

नगरपरिषदेच्या कामकाजात नगरसेविका यांचे पती/ नातेवाईक यांचे सभेचे कामकाज/चर्चा यामध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत तसेच नगरपरिषदेच्या कार्यालयीन कामकाजातील ढवळाढवळ, हस्तक्षेप करणे किंवा कर्मचारी/अधिकारी वाद यांच्याशी घालणे, उपमर्द करणे इ. गैरवर्तणूक बाबी निदर्शनास आल्यास नगरपरिषदेचे अध्यक्ष/ मुख्याधिकारी यांनी याबाबत त्वरीत दखल घेऊन उचित कार्यवाही करण्याबाबत राज्य सरकारच्या 20 जुलै 1993 मधील निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे.

या निर्णयानुसार नगराध्यक्षा यांचे पतीचा नगरपरिषद कामकाजातील हस्तक्षेप थांबवण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. अहवाल या कार्यालयास पाठवावा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.