Alandi : ज्ञानेश्वर महाराज समाधीवर आजपासून महापूजा बंद ; समाधीऐवजी पादुकांचे पूजन

एमपीसी न्यूज- आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर यापुढे अभिषेक आणि महापूजा करता येणार नाही. संजीवन समाधीची होत असलेली झीज आणि भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापुढे समाधीऐवजी पादुकांचे पूजन केले जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी आज, शुक्रवारपासून करण्यात येणार आहे. या बदलास होत असलेला विरोध पाहता देवस्थानने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. याबाबतची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी पत्रकारपरिषदेमध्ये दिली आहे.

यावेळी विश्वस्त डॉ.अभय टिळक, अजित कुलकर्णी, व्यवस्थापक माउली वीर, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

ढगे पाटील म्हणाले, “भाविकांच्या महापूजा संजीवन समाधी ऐवजी चलपादुकांची महापूजा करण्यात येणार आहे. श्रींची समाधी संवर्धन, जतन आणि पूजा, अभिषेक, महापूजा या प्रसंगीचे पावित्र्य यास प्राधान्य देऊन निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची कार्यवाही करताना योग्य त्या सूचनांचे स्वागत केले जाणार आहे. आळंदीतील श्रींचे दर्शनास होणारी भाविकांची गर्दी तसेच भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घेता यावे यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. येथील पूजा उपचार बाबत प्राप्त तक्रारी तसेच भाविकांच्या मागणीचा विचार करून प्रायोगिक तत्वावर निर्णय घेण्यात आला आहे” यासाठी भाविकांसह नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांची या निर्णयामुळे दर्शनास गैरसोय होणार नाही. वारकऱ्यांना दर्शनास महापुजे मुळे विलंब होत असे.आता भाविकांचे दर्शनास वेळ कमी लागेल. कमी वेळेत जास्त भाविकांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे. असे ढगे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.