Alandi : कंपनीतील कॉन्ट्रॅक्टवरून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – आळंदी येथील एका कंपनीत मालवाहतुकीच्या कॉन्ट्रॅक्ट वरून तिघांनी मिळून तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणाकडून मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जे एस डब्ल्यू कंपनी, वडगाव रोड, आळंदी येथे घडली.

अजय विनायक नागरगोजे (वय 22, रा. चिखली) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रफुल्ल मुंगसे, सुमित थोरवे, गणेश कुऱ्हाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आळंदी येथील जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये मालवाहतुकीच्या कॉन्ट्रॅक्ट वरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. आरोपींनी अजयला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कंपनीमध्ये माल भरण्यासाठी गाड्या आणायच्या नाहीत, अन्यथा ठार मारुन टाकीन’ अशी आरोपींनी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी अजयचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.